- सुकेशनी नाईकवाडे, बीड
आज सकाळी सहा वाजता बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील घाट पिंपरी गावावर ढगफुटी झाल्याने गावाशेजारील नदीला महापूर आला आणि पुराचे पाणी गावकऱ्यांच्या घरात शिरले. अनेक शेतकरी गाढ झोपेत असताना अचानक आलेल्या पुरामुळे जीव वाचवण्यासाठी गावकरी धावपळ करू लागले. मात्र या पुरात जवळपास 300 शेळ्या आणि अनेक गायी-म्हशी वाहून गेल्या.
शेतकऱ्यांच्या डोळ्यांपुढे उभा राहिलेला संसार क्षणात पुराच्या पाण्याने गिळंकृत केला. दादा तळेकर यांचा कांद्याचा चाळ पूर्णपणे वाहून गेला. भगवान तळेकर यांची तब्बल अडीच एकर केळी आणि सोयाबीन वाहून गेल्याने जवळपास 20 लाख रुपयांचे नुकसान झाले. रामेश्वर तळेकर यांच्या शेतातील सोयाबीनसह मातीही वाहून गेल्याने शेतात दहा फूट खोल खड्डे पडले आहेत. शेतं आता शेतीसारखी उरली नाहीत, तर फक्त दगडांनी भरलेली ओसाड जागा उरली आहे.
डोळ्यासमोर उभा केलेला संसार पाण्यात वाहून गेल्याने गावातील महिलांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयेत. याच गावातील बारावीची विद्यार्थिनी शिवानी मुळीक पुरामुळे तिची सर्व वह्या-पुस्तकं गमावून बसली. बाईमाणूस टीमशी बोलतांना ती तिची भिजलेली पुस्तकं दाखवत जो प्रश्न विचारते तो अत्यंत हृदयद्रावक आहे, ती म्हणते, “माझं शिक्षण आता मी कसं पूर्ण करणार? आमच्या शेळ्या वाहून गेल्या, वह्या-पुस्तकं भिजली, मला दप्तर कोण देणार? सरकारने काही तरी करावं" 
वनवेवाडीचा वनवास.. आठ दिवसांपासून डोंगरावरच संसार
घाटा पिंपरीनंतर वनवेवाडी गावालाही ढगफुटीचा तडाखा बसला. रात्री साडेनऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण गाव पाण्याखाली गेलं. ग्रामस्थांना डोंगरावर जाऊन आसरा घ्यावा लागला. गावातील विहिरी मातीने बुजल्या, शेतीचे पिकं वाहून गेली. विजेचा, अन्नाचा, मोबाईल रेंजचा थांगपत्ता नाही. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गेल्या आठ दिवसांत तहसीलदार, तलाठी किंवा प्रशासनाचा एकही प्रतिनिधी गावात पोहोचलेला नाही.
संबंधित लेख वाचा: 'गर्भ'गळीत बीड… 843 महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशव्या काढल्या! |
या गावकऱ्यांशी बाईमाणूसने संपर्क साधल्यावर वनवेवाडीतील अंकुश गर्जे यांनी आक्रोश व्यक्त करत सांगितलं, “गेल्या आठ दिवसांपासून आम्ही डोंगरावरच आहोत. गावात अन्न नाही, वीज नाही, रेंज नाही. प्रशासनाचा पत्ता नाही.. आम्हाला प्रशासनाने तात्काळ मदत करावी हीच आमची सरकारकडे मागणी आहे..” याच गावातील नंदुबाई गर्जे बाईमाणूसशी बोलतांना म्हणतात, "आम्हाला नाही पण किमान आमच्या लहान लेकरांना तरी अन्न मिळावं म्हणून मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो. आमची दयनीय अवस्था त्यांनी एकदा तरी बघावी आणि आम्हाला काहीतरी मदत करावी.”
माळेवाडीतील विदारक घटना, उपचाराअभावी शंकर शेंडे यांचा मृत्यू...
पुराच्या पाण्याने माळेवाडी गावाचा संपर्क तुटल्याने गावकरी अडकून पडले आहेत. या दरम्यान सर्वात वेदनादायी घटना घडली ती म्हणजे शेंडे कुटुंबातील शंकर कुंडलिक शेंडे यांची प्रकृती अचानक बिघडली. मात्र रुग्णालयात नेण्याचा रस्ता नसल्याने उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. 
मळेवाडीतील गावकरी बाईमाणूसशी बोलतांना सांगतात, “आमच्या डोळ्यांसमोर घरचा माणूस तडफडत होता, पण कोणतीही गाडी गावात येऊ शकली नाही. अखेर तीन दिवसांनी आम्ही शंकर यांना चक्क बाजेवरून एक किमी अंतर आणलं, पण उशीर झाला होता. दवाखान्यात दाखल करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं."
शंकर शेंडे यांच्या निधनानंतर ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे. “देशाला 75 वर्षं स्वातंत्र्य मिळूनही आम्हाला साधी दोन चाकी गाडी जाईल एवढा रस्ता नाही. आमच्या घरचा माणूस गेला तरी कोणी भेटायला आलं नाही. ही आमची विदारक परिस्थिती आहे.” असा आरोप गावकऱ्यांनी केला. गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला माहिती दिली, पण 'रस्ता नाही म्हणून आम्ही येऊ शकत नाही' असं उत्तर त्यांना देण्यात आलं. आजही माळेवाडी गावाचा संपर्क तुटलेलाच आहे.






